ताज्या घडामोडी

  • Home
  • ताज्या घडामोडी

दिल्लीत दाऊद-ISI चे मोठे दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त; ९ संशयितांना अटक

30-05-2026

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने शनिवारी एक मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'ISI' यांच्या संयुक्त नेटवर्कशी संबंधित एका मोठ्या दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, राजधानी दिल्लीतील अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर मोठे हल्ले करण्याचा त्यांचा कट उधळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संशयित दिल्लीतील सरकारी प्रतिष्ठाने, सुरक्षा दलाचे जवान आणि प्रमुख धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नेपाळी वंशाच्या नागरिकांचाही समावेश असून, पाकिस्तानी हँडलर्स आणि मुंबई अंडरवर्ल्डच्या स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून हे मॉड्यूल चालवले जात होते. पोलिसांनी या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक बंदुका, स्फोटके आणि अनेक हातबॉम्ब जप्त केले आहेत, ज्यामुळे दिल्लीवरील तात्कालिक धोका टळला आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला पोलीस आयुक्त सतीश गोल्छा यांनी दिल्लीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'काउंटर-टेरर युनिट्स' स्थापन करण्याचे आदेश दिले होते. परदेशात बसलेले दहशतवादी हँडलर्स सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर करून स्थानिक स्लीपर सेल्स सक्रिय करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. सध्या पोलीस या मॉड्यूलच्या फंडिंग आणि स्थानिक मदतगारांचा शोध घेत आहेत.

११ वर्षांतील निचांकी पाऊस; 'एल निनो'मुळे देशात दुष्काळाचे सावट, पेरण्या खोळंबणार!

30-05-2026

देशात यंदा ११ वर्षांतील सर्वात कमी मान्सून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. L Ninoच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान विभागाने ९२ टक्के पावसाचा अंदाज दिला होता, ज्यात आता आणखी दोन टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. २०१५ नंतरचा हा सर्वात नीचांकी पाऊस ठरणार आहे.
जून महिन्यातच पावसाचे प्रमाण ९२ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने राज्यातील खरीप पेरण्या रखडणार आहेत. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचा समावेश असलेला 'मान्सून कोअर झोन' सर्वाधिक प्रभावित होणार असून, येथे केवळ ९४ टक्के पावसाचा अंदाज आहे.
केरळमध्ये जरी पुढील आठवड्यात मान्सून दाखल होणार असला, तरी जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होईल. महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागेल. जुलै आणि ऑगस्टमध्ये 'एल निनो'ची तीव्रता मध्यम, तर सप्टेंबरमध्ये ती अधिक तीव्र होणार असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा,कोल्हापूर गॅझेटचा विचार करावा- शाहू महाराजांची मागणी

30-05-2026

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू होताच समृद्धी महामार्गावर नाव्हा शिवार येथे मराठा बांधवांनी रस्ता रोको करत वाहतूक ठप्प केली आहे. या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे; मात्र त्याच वेळी आरक्षणाच्या वाटाघाटींमध्ये 'कोल्हापूर गॅझेट'कडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे, सरकारने कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांनीच देशात आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली, याची आठवण करून देत ते म्हणाले:
"आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटचा पुरेसा विचार केला जात नाही. मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते, मात्र कोल्हापूर गॅझेटचा देखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे. जर समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले, तर जनतेमध्ये तीव्र उद्रेक होईल."

पुण्याचे दारूकांड: पैशापाई विषारी साखळीच्या तोंडी 13 जणांचा बळी

30-05-2026

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणाने आता भीषण वळण घेतले आहे. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी पुण्याच्या ग्रामीण भागातून सुरू झालेला हा 'विषारी खेळ' आता १३ जणांच्या जीवावर बेतला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत याला 'हत्या' संबोधले असून, संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचे कडक आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापती मुंबईहून इथेनॉल आणून विनापरवाना दारू तयार करत असे. आरोपी योगेश वानखेडेने या दारूत अधिक नफ्यासाठी 'मिथेनॉल' मिसळले, ज्यामुळे ती विषारी बनली. वानखेडेने हे विष पिंपरीच्या फुगेवाडीतील कर्नलसिंह विरखा आणि गुरमितसिंह विरखा या 'सरदारजी' बाप-लेकांच्या गुत्त्यासह खडकी, वडारवाडी आणि हडपसरमधील अड्ड्यांवर सप्लाय केले. या दारूमुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे की, पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून ८ जणांना अटक केली आहे मिथेनॉलची ही साखळी शोधून सर्व आरोपींवर हत्येचा गुन्हा आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

कोल्हापूरच्या 'कलापुरी'चा जगभर डंका! 'द कोल्हापुरी' पुस्तकाला ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

30-05-2026

कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलेचा हजार वर्षांचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणणाऱ्या “द कोल्हापुरी” या पुस्तकाने जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडलेल्या भव्य समारंभात या पुस्तकाला जाहिरात क्षेत्रातील अत्यंत मानाचे ११ 'क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स' मिळाले आहेत. यामध्ये सर्वोच्च समजला जाणारा 'ब्लॅक एलिफंट' पुरस्कार पटकावून कोल्हापूरच्या वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. 'कलापुरी'चे संस्थापक प्रा. श्रीधर वैद्य, सौ. अपर्णा चव्हाण आणि आतिश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मिलान फॅशन वीक २०२५ मध्ये 'प्राडा' या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चपलेशी मिळत्याजुळत्या चपला प्रदर्शित केल्या होत्या, मात्र त्याचे श्रेय मूळ कारागिरांना दिले नव्हते. याचा केवळ निषेध न करता, जी. आय. मार्क असणाऱ्या कोल्हापूरच्या 'कलापुरी' स्टार्टअपने व्ही.एम.एल. या जागतिक मीडिया एजन्सीच्या मदतीने 'द कोल्हापुरी' हे हस्तलिखित पुस्तक तयार केले. कल्पेश पाटणकर, स्नेहा चव्हाण यांच्या सहकार्याने साकारलेल्या या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर 'क्लिओ अवॉर्ड्स', 'D&AD वुड पेन्सिल' आणि 'अँबीज अवॉर्ड्स' देखील पटकावले आहेत.
या दिमाखदार सोहळ्याला प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, क्युरियसचे राजेश केजरीवाल, व्ही.एम.एल.च्या सीईओ बबिता बरूआ उपस्थित होत्या. तर प्रसिद्ध दिग्दर्शिका गौरी शिंदे आणि हर्षद राजाध्यक्ष यांनी ज्यूरी (Jury) म्हणून काम पाहिले.
अपर्णा आणि आतिश चव्हाण यांनी सुरू केलेल्या 'कलापुरी' या स्टार्टअपने मोरेवाडी (पन्हाळा), यळगुड (हातकणंगले) आणि सोनी (मिरज) येथील केंद्रांच्या माध्यमातून ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन घरबसल्या शाश्वत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. "हा जागतिक सन्मान आम्ही कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या सर्व कष्टकरी कारागिरांना आणि कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करतो," अशी भावना आतिश चव्हाण यांनी व्यक्त केली.

View All the Podcast Episodes today!

Sakalaam Youtube Channel
img